द्राक्ष शेती व कोरोना

वर्ष 2019 मे महिना पाण्याची अतिशय भीषण टंचाई साधे पिण्याला ही पाणी मिळेना. अशात द्राक्षबागा कशा जगवायच्या ही पंचायत द्राक्ष बागातदार पुढे होती. तरीपण जिद्दीने निसर्गाशी लढत द्राक्ष बागा जगवल्या आणि नुसत्या जगवल्या नाही तर उत्तम प्रकारे घडही आले. पण निसर्गाला शेतकऱ्याची जीत मान्य नव्हती, निसर्गाने आता शेतकऱ्यांची चांगलीच परीक्षा घ्यायची ठरवली होती शेतकऱ्यांनी अतिशय हूरुपाने ऑक्टोबर छाटणी केली आणि चांगल्या प्रकारे मालही आला होता. सप्टेंबर 2019 च्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली आणि पाहता पाहता नोव्हेंबर उजाडेपर्यंत पाऊस चालू झाला या पावसात शेतकऱ्यांचीच नाहीतर द्राक्ष बागेची ही कसोटी झाली लहान मुले, म्हातारी माणसं अतिशय जिद्दीने निसर्गासमोर लढत होते आणि हाताने पावडर मारीत होते तर कोणी द्राक्षबागेत कमरे पर्यंत साचलेले पाणी काढत होते. एक ट्रॅक्‍टर गाळात अटकला म्हणून दुसरा टॅक्टर जोडत होते. तो काढण्यासाठी तिसरा टॅक्टर जोडला जाई आणि तोही गाळात अडकून बसायचा अशातच दिवस जात होता, पो टाला अन्न पाणी कशाचीही जाणीव होत नव्हती. ट्रॅक्टर ने स्प्रे मारता येत नव्हता म्हणून हाताने पावडर मारावी लागत होती. साचलेल्या पाण्यात साप फिरत होते आणि वरती द्राक्षबागेला फवारणी करण्याची काम चालू होते. अशा या कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी द्राक्षबागा वाचवल्या आणि विक्रीसाठी तयार केल्या पण एवढ्यावरच शेतकऱ्याची परीक्षा कुठे संपणार होती, तोच कुठे चीनमध्ये कोरोणाचा जन्म झाला. आणि पाहता पाहता कोरणा भारतात येऊन पोहोचला. भारतात कोरोना आढळल्याने लॉक डाऊन सुरू झाले.त्याचे दुष्परिणाम सगळ्या जगाला भोगावे लागले,पण द्राक्ष बागायतदारला याचा फार मोठा तोटा सहन करावा लागला. सोन्यासारखी पिकवलेली द्राक्ष फेकून देण्याची वेळ आली.अस वाटायचं ह्या वर्षी तरी बँकेचे कर्ज फेडू पण कर्ज तर दूरच उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही. तरी पण शेतकरी हरणार नाही,पुन्हा एक नव्या जिद्दीने निसर्गाशी लढायला तयार आहे.